मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापुर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्या सोबत जाणे पसंत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. त्यातच सर्वच मीडिया माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती असो किंवा महाआघाडी सत्तेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाविकास आघाडीच्या बैठकीत देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित राहून जागा वाटपावर चर्चा केली होती. मात्र पुढील काळात ही चर्चा अर्धवट राहिली आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकाही मतदारसंघात यश आले नाही. विधानसभा निवडणुकीत तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.