मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असतांना नुकतेच राज्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी सर्वच संस्थांनी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होत नसले तरी देखील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी सत्ता स्थापनेची तयारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयाची शक्यता असणाऱ्या भाजपच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधला जात आहे. अशा विजयी झालेल्या आमदारांवर पक्षांतर्गत झालेली कारवाई देखील मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता संपली असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार? याविषयी अंदाज लावले जात आहेत. मात्र अनेक मीडिया संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच राहील, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करताना अपक्षांची मदत लागू शकते. याची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक बंडखोर या निवडणुकीत उभे होते. यातील विजयाची शक्यता असणाऱ्या बंडखोरांशी आतापासूनच संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
महायुतीच्या वतीने जागा वाटप भाजपाला न सुटलेल्या जागांवर भाजपतील इच्छुकांनी निवडणुकीत शड्डू ठोकत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील काही उमेदवारांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत घेण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा बंडखोरांवर पक्षाने आधीच निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची तयारी पक्षाने सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.