यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगर काठोडा येथे बहिणीच्या विवाह सोहळ्याच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोंगरकठोरा, ता. यावल येथे रविवारी घडली. यामुळे आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली. यामुळे गावच सुन्न झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश भगत (वय ३६) असे या तरुणाचे नाव आहे. राकेश यांनी वयाच्या अवघ्या १०-१२व्या वर्षी वडताल (गुजरात) येथे स्वामीनारायण संप्रदायाचा स्वीकार केला होता, रविवार, दि. १७ रोजी बहीण नम्रता हिचे रविवारी लग्न असल्याने राकेश हे डोंगर कठोरा येथे आले होते. स्वामीनारायण मंदिरात ते थांबले होते. रविवार रोजी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राकेश भगत यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर एकच शोककळा पसरली. यानंतर रविवारी दुपारी दहीगाव, ता. यावल येथे अतिशय साध्या पद्धतीने नम्रता हिचा विवाह पार पडला. यानंतर सायंकाळी राकेश यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी पूर्ण गाव लोटला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. राकेश हे लीलाधर रामा सरोदे यांचे पुत्र होत.