लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रेशनदुकानदारावर गुन्हा झाला आहे. यामुळे रेशनदुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.