नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी बिबट्याची दहशत कायम असतांना नुकतेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वन परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. हा हल्ला झाला त्यावेळी तरुणाचे वडील व काका सोबत होते. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. हरिराम गंगाराम धिकार (रा. केसरपूर) असे मृताचे नाव आहे.
हरिराम त्याच्या वडील व काकांसह जंगलात गेला होता. हरीसालपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर जंगलात हे तिघेही चारा आणण्यासाठी गेल्याचा अंदाज आहे. दरम्यान हे बफर झोनमध्ये असतानाच अचानक वाघाने हरिराम यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर वाघाने त्यांना ओढत सुमारे ३०० ते ४०० मीटर दूरवर नेले. हरिरामसोबत असलेले वडील व काका कसेबसे जीव वाचवून गावात पळत आले.
हरिरामच्या शरीरावर असंख्य जखमा केल्या. त्यामुळे मृतदेह रक्तबंबाळ झाला होता. त्यानंतर वाघाने हरिरामचा मृतदेह ओढत सुमारे ३०० ते ४०० मीटर नेला. त्याठिकाणी वाघाची गुहा होती. ही बाब वन विभागाने मृतदेहाचा शोध घेतला त्यावेळी लक्षात आली.
हरिसाल वनपरिक्षेत्रात रविवारी हरिरामवर ज्या ठिकाणी वाघाने हल्ला चढवला. त्याचठिकाणी राजेश कास्देकर नामक तरुणावर १२ जून २०२३ रोजी हल्ला केला आहे. त्यामध्ये राजेशचा मृत्यू झाला होता. आजही वाघाने त्याच ठिकाणी हल्ला केला आहे.