धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जांभोरे येथे बैलगाडीला बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बैलजोडीसह शेतकरी ठार झाला. ही घटना गुरुवारी घडली. मृत शेतकऱ्याचे नाव गोपाल केशव अहिरे (६७) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत असताना पारोळा धरणगाव रस्त्याला जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक धरणगाव बसने क्रमांक (एम. एच २० बी. एल. ३३६३) जोरदार धडक दिली. अपघातात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला. बैलजोडी ही जागीच ठार झाली. शेतकरी गोपाल अहिरे गंभीर जखमी झाले. त्यांचे लहान बंधू नाना अहिरे यांनी तत्काळ त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला व पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बसचालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल अहिरे यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीय हतबल झाले आहे. या कुटुंबीयाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना. नातवंडे असा परिवार आहे.