मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सर्वच नेत्यांनी आपआपले उमेदवारी अर्ज भरले आहे. तर आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे. नुकतेच महायुतीचे नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट गद्दार म्हणले असल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिराळा येथील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावार बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
सदभाऊ खोत शरद पवारांवर टीका करताना म्हणाले, मी ज्या सभागृहात काम करतो, त्या सभागृहाचे सभापती होते शिवाजीराव देशमुख. ते आजारी होते. घरात मशीन बसवल्या होत्या. रक्त बदलावे लागत होते. रक्त बदलल्यावर ते उठून कामाला लागायचे. ते सभापती होते, त्यांच्यावर तुम्ही कठीण काळात अविश्वास ठराव आणला. पवार साहेब ही तुमची गद्दारी आहे, असा आरोप सदभाऊ खोत यांनी केला आहे.
सदभाऊ खोत म्हणाले, देशमुख साहेब म्हणत होते मी आजारी आहे. मी स्वतःहून राजीनामा देतो. माझा तुम्ही अपमान करू नका. मला काही नको आहे. थोडे मला बरे होऊ द्या. मी चालत त्या सभागृहाच्या दरवाजात येतो आणि राजीनामा देतो. अरे तुम्ही त्या माणसावर अविश्वास ठराव आणला. पवार साहेब ही तुमची गद्दारी आहे. या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदारसंघातील जनता या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, इथे आपणच गुंड आहोत आणि कोणी जर आरोप करत असेल तर आपल्याकडे नऊ नंबरच्या नांगराचा फाळ आहे, तो जमिनीत एवढा घुसवू की फाटल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. मी दोनदा आमदार गोट्या खेळून झालो नाही असे खोत म्हणाले. गृहमंत्री महायुतीचा असून गुंडा गर्दी झाली तर त्याची खैर नाही अशा शब्दात असे खोत म्हणाले.