जळगाव : प्रतिनिधी
कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले असताना त्र्यंबक नगरात दीपक सखाराम खांडेलकर यांच्याकडे तब्बल वीस लाख रुपयांची धाडसी घरफोडीची घटना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार दीपक खांडेलकर त्र्यंबक नगरातील साखरवाडी भागात वास्तव्याला आहेत. २२ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले होते. बुधवारी दुपारी ते घरी पोहोचले असता घराचा दरवाजा व कडी कोयंडा तुटलेला होता. कपाटात ठेवलेल्या पाटल्या, कंगन, नेकलेस, टॉप, तीन अंगठ्या साखळी, ब्रेसलेट आदी २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीस हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे लक्षात आले.
खांडेलकर यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक अशोक नकाते उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह रामानंदनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान व फिंगरप्रिंट पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.