चोपडा : प्रतिनिधी
भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि. ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव-देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खाचणे येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४) खासगी कामानिमित्त दुचाकीने (एम. एच. १९ एजे ४३९७) अमळनेरकडे येत असताना देवगाव देवळी फाट्याजवळ चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसने (एम. एच. २० बीएल २५३८) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
अपघातात भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बसचालक शेख मिनाजोद्दीन जहीरोद्दीन (रा. अडावद, ता. चोपडा) याच्या विरोधात अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुनील पाटील करत आहे. भानुदास पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. ते विनोद व नरेंद्र यांचे वडील होत.