मुंबई : वृत्तसंस्था
शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर गेल्या 36 तासांपासून ते अज्ञातवासात गेले होते. यानंतर आता वनगांचा कुटुंबयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजता श्रीनिवास वनगा हे घरी येऊन पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा हे तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे पत्नीने स्पष्ट केले आहे
गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे. महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते.
पण मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी आले. त्यांनी त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि ते पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे विश्रांतीसाठी गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. मात्र आता श्रीनिवास वनगा यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबही गायब झाले आहे.
पालघरचे नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा हे 36 तासांनी आपल्या घरी परतले. यानंतर ते पुन्हा एकदा मित्रांसोबत बाहेर गेले. यामुळे कुटुंबीयांची चिंता मिटली होती. त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी श्रीनिवास वनगा विश्रांतीसाठी नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले होते. विश्रांतीनंतर ते काही दिवसांनी घरी परततील. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती.
श्रीनिवास वनगा हे मित्रासोबत बाहेर गेल्यानंतर आता त्यांचे कुटुंबियही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या घरी कोणीही नसून त्यांच्या घराला कुलूप आहे. श्रीनिवास वनगा यांचे घर बंद आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे कुटुंबिय घरी नसल्याने हे सर्वजण नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.