यावल : प्रतिनिधी
रागाच्या भरात १९ वर्षांची एक तरुणी आपल्यासोबत तीन अल्पवयीन मुलींना घेऊन सोमवारी घरून निघून गेली होती. या चार मुली अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. पालकांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोध घेत या मुलींना कल्याण रेल्वेस्थानकात ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील एक १९ वर्षीय तरुणी व तिच्या दोन १६ वर्षीय व एक ८ वर्षीय, अशा तीन अल्पवयीन मैत्रिणी या कुटुंबाशी झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात सोमवारी आपल्या घरून निघून गेल्या होत्या. पोलिसांत माहिती मिळताच तपास पथकाने भुसावळ रेल्वे पोलिसांची मदत घेतली. नंतर भुसावळ रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या मुली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका रेल्वेत बसल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी तातडीने नाशिक पोलिसांना माहिती दिली. नाशिक पोलिसांचे पथक रेल्वेस्थानकावर थांबले होते. मात्र, तिथे या मुली तेथे उतरल्या नाहीत व पुढे कल्याण येथील रेल्वे पोलिस गोरख गायकवाड यांना माहिती देण्यात आली.
या मुली रेल्वेस्थानकावर उतरल्या. नंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले व यावल पोलिसांना माहिती दिली. यावल पोलिसांचे पथक व या मुलींचे पालक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या चार मुलींना आता तिथून सुरक्षितपणे आणण्यात येत आहे. या तपास पथकात पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, वसंत बेलदार, हेमंत सांगळे, इस्तियाक सय्यद, मुकेश पाटील, असलम खान, वासुदेव मराठे, मोहन तायडे यांचा समावेश होता.