रावेर : प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमोल जावळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. मतदारांमध्ये परिवर्तनाबद्दल उत्साह असून, यावेळी जनता महायुतीला मतदान करून सत्ता परिवर्तन करणार असल्याचा विश्वास अमोल जावळे यांनी व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री आ. अर्चना चिटणीस, माजी खासदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात रावेरच्या पाराच्या गणपती मंदिरापासून झाली. फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये अमोल जावळे आणि महायुतीचे पदाधिकारी आरुढ झाले होते, त्यांनी मतदारांना अभिवादन केले. रॅलीत भाजपा कार्यकर्ते गळ्यात पक्षाचे रुमाल घालून सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी उत्साहाने नाचत परिसरात उर्जित वातावरण निर्माण केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. राजेंद्र फडके, सुरेश धनके, अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, डॉ. कुंदन फेगडे, उमाकांत महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी, सी. एस. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, राजन लासुरकर, श्रीकांत महाजन, पी. के. महाजन, वासुदेव नरवाडे, भास्कर महाजन, वाय. व्हीं. पाटील, पांडुरंग सराफ, डॉ.प्रियदर्शनी सरोदे, राहुल पाटील, डॉ.दीपक पाटील, आणि अन्य महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल जावळे यांनी जनतेसमोर आपले विकासाचे व्हिजन स्पष्ट केले आणि विधानसभा क्षेत्रात सर्वांगीण प्रगती साधण्याचा संकल्प व्यक्त केला. मतदारांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा मिळत असल्याची भावना व्यक्त करत, त्यांनी आगामी निवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार दर्शवला.