चोपडा : प्रतिनिधी
शहरातील पं. स. समोरील डेअरीतून घेतलेल्या दुधात प्लास्टिक सापडल्याचे सांगत तसा व्हिडीओ व्हायरल केला. तसेच डेअरी मालकाला धमकी देऊन ७५ हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी ऋषी संजय पाटील (२७) व बिडगाव येथील शिक्षक संजय विक्रम पाटील (दोघे बिडगाव, ह. मु. साने गुरुजी कॉलनी, चोपडा) या पिता पुत्राविरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील डेअरीतून ऋषी पाटील याने दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दूध घेतले. ऋषी याने घरी दूध तापवले असता, दुधावर प्लास्टिकसदृश साय आली. ऋषी याने त्याचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला. तो व्हिडीओ डेअरीचे संचालक प्रल्हाद बळीराम पाटील (५५, गणेश कॉलनी, चोपडा) यांना टाकला आणि बदनामी थांबवायची असेल तर एक लाख रुपये द्या, अशी मागणी केली.
त्यानंतर ऋषी पाटील आणि त्याचे शिक्षक वडील संजय पाटील हे दोघे पिता-पुत्र पाटील यांना डेअरीवर जाऊन भेटले. त्यांनी हे प्रकरण थांबविण्यासाठी पैशाची मागणी केली. पाटील यांनी घाबरून ऋषी यास रक्कम दिली. हे प्रकरण प्रल्हाद यांनी चोपडा शहर पोलिसांना सांगितले. त्यावरून शनिवारी ऋषी आणि संजय पाटील (५२) यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.