जळगाव : प्रतिनिधी
माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. सोमवारी दि. २८ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या १० वर्षातील जनसेवेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आ. भोळे यांनी गेल्या दहा वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विकास पुरुष देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची गंगा जळगाव शहरात आणली. हीच विकास कामांची व जनसेवेची समृद्ध परंपरा आता पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार राजूमामा भोळे यांनी माध्यमांना दिली आहे.
आ. राजूमामा भोळे सोमवारी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय या पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी नामांकन रॅलीकरीता महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही आवाहन आ.भोळे यांनी केले आहे.