जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.
या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. अहवाल शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अहवाल वाचून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहे.
सुरक्षारक्षक दुर्गे व डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखी मान्य केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. तसेच या प्रकरणात शिक्का व सही बनावट आढळले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले. दरम्यान, दुर्गे व स्वप्नील पाटील हे नातेवाईक आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी समिती नेमलेली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांची समिती नेमली आहे. या समितीने देखील शनिवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन संबंधित अधिष्ठाता यांनी नेमलेल्या समितीशी चर्चा केली.