चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील बामोशी बाबा दर्गा परिसरातील भाविकांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालेगाव येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात झोपलेल्या भाविकांना काही लोक चाकूचा धाक दाखवून पैसे व मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना रात्रीची गस्त घालत असतांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, हवालदार योगेश बेलदार, अजय पाटील, नीलेश पाटील, शरद पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे व्यक्ती अहिल्यादेवी चौकाकडे दुचाकीवरून पळाल्याने पोलिसांनी आपला ताफा त्या दिशेन वळवला. याच वेळी तीन व्यक्ती दुचाकीवरून जात असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. या वेळी त्यांना पकडून विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अस्लमखान शफीक खान व मोहम्मद अमान सफर अली (दोन्ही रा. मालेगाव) व अन्सारी रमजान वलीजान (रा. पवारवाडी, मालेगाव) असे सांगितली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ कोयता, चाकू मिळाला. पोलिसांनी ही शस्त्रे व दुचाकी असा ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात हवालदार अमोल भोसले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.