मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असून दुसरीकडे मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. इच्छुकांशी चर्चा करुनच उमेदवार निश्चित करणार असल्याचे जरांगे यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी अनेक इच्छुक जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गर्दी करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार, अशी धमकी एका युट्युब चॅनलच्या कमेंटमधून दिली आहे. एका अज्ञाताने ही धमकी दिली असू यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
युट्युबवरील एका चॅनलच्या कमेंटमध्ये बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार, अशा आशयाची ही धमकी आहे. ऐन निवडणुकीत मनोज जरांगेंना धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून जरांगे बसत असलेल्या सरपंच मळा येथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच जरांगेंना भेटण्यासाठी येणाऱ्या सर्वांची तपासणी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार आहे. 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील. सर्वांना हात जोडून विनंती करणार एकच जण उभे रहा. किती मतदारसंघ काढायचे हे आज जाहीर करायचे नाही. काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता एकच उमेदवार दिल्यावाचून पर्याय नाही, असे मनोज जरांगे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले