जळगाव : प्रतिनिधी
जीएसटी व आयकराच्या कामासाठी दिलेले ३० लाख रुपये परत मिळावेत, यासाठी दोन कंत्राटदारांनी सीए सुहास प्रफुल्ल दहाड (३७, रा. सुयोग कॉलनी) यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा टाकी परिसरात असलेल्या सुयोग कॉलनीतील सुहास दहाड हे चार्टर्ड अकाउंटंट असून, कंत्राटदार नीलेश संजय मोरे व तुषार कैलास धनगर या दोघांकडून पाच ते सहा महिन्यांपूर्वी जीएसटी व इन्कम टॅक्सच्या कामासाठी दहाड यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले होते त्यानुसार त्या दोघांचे कामदेखील दहाड यांनी करून दिले होते. काम करूनदेखील दोघे दहाड यांच्या घरी येऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचे.
त्यावर दहाड यांनी वेळोवेळी त्या कंत्राटदारांना मी तुमचे काम करून दिले असून, तुमचे कोणतेही पैसे माझ्याकडे बाकी नाहीत, असे सांगितले. मात्र, तरीदेखील त्या दोन्ही कंत्राटदारांकडून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली जात होती. २२ ऑक्टोबर रोजी मोरे व धनगर हे दहाड यांच्या घरी गेले व पैशांची मागणी केली. दहाड यांनी पैसे बाकी नसल्याचे सांगितल्यानंतर दोन्ही कंत्राटदारांनी मारहाण करीत त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांच्या पत्नी सरिता दहाड यांनी रामानंदनगर पोलिसत फिर्याद दिली.