अमळनेर : प्रतिनिधी
शेतीच्या वहिवाटीवरून असलेल्या वादातून एका कुटुंबाला ३५ जणांनी मारहाण, तर एकावर विळ्याने वार केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी एकतास (ता. अमळनेर) गावात घडली. जखमी उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलिस स्टेशनला ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकतास येथील गोकुळ आनंदा बच्छाव आणि जयेश दुर्योधन वाघ यांच्या दोघांच्या शेतीची एकच वहिवाट असून, त्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. १३ रोजी सायंकाळी गोकुळ बच्छाव हे चुलत मामीची अंत्ययात्रा आटोपून परत येत असताना जयेश दुर्योधन वाघ, दुर्योधन निंबा वाघ, भरत निंबा वाघ आले व त्यांना मारहाण करू लागले. त्यावेळी जयेश याने विळ्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला असता, गोकुळने हातावर वार झेलून त्याच्या मधल्या बोटाला व अंगठ्याला जखम झाली.
त्याच वेळी विजय आधार वाघ, ज्ञानेश्वर आधार वाघ, गुणवंत संजय वाघ यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरेश आसाराम वाघ, देविदास आसाराम वाघ, अधिकार आसाराम वाघ, संजय आसाराम वाघ, दीपक अधिकार वाघ यांनीही प्रोत्साहन देत, त्यांना मदत केल्याचे म्हटले आहे. गोकुळ याना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचार घेऊन परत आल्यावर २१ रोजी गोकुळ बच्छाव यांनी मारवड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.