मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, भाजप वगळता महायुती आणि महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये, यादी जाहीर होताच इच्छुकांची बंडखोरी टाळण्याच मोठं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे. या सर्वांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे. त्यांनी नुकतीच वाय. बी चव्हाण येथे शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचा आणखी एक शिलेदार शरद पवार यांच्या गळाला लागला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे, अजित पवार गटातून काही नेत्यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आता मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी देखील अजित पवार यांची साथ सोडली आहे, हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.