मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दोन दिवसात आता सर्वच पक्षाचे उमेदवार देखील जाहीर होणार आहे. नुकतेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मनोज जरांगे पाटील आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही ठाम आहेत. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि आचारसंहिता सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मोठा घोषणा केली आहे. जिथे निवडून येईल तिथे आपला उमेदवार उभा करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल असं बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून आणा. नसेल लिहून देत तर त्याला पाडा. जिथे एस्सी एसटीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करू नका, जो उमेदवार आपल्या विचाराचा असेल तर त्याला मत देऊन निवडून आणा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.