मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांसह उमेदवारांनी कंबर कसली असून दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे रुग्णालयातून बाहेर येताच त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून उद्धव ठाकरेंनी यावेळी विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. विद्यमान आमदारांमधील काही आमदारांची उमेदवारी निश्चित असल्याचे देखील बोलले जात आहे.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील उद्धव ठाकरे यांनी दिले असून 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आजची झालेली बैठक ही महत्त्वाची मानली जात असून याकडे शिवसेना ठाकरे गटातील सर्वच नेत्यांचे लक्ष लागले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जात आहे. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचे आहे, ते आमदार त्यादिवशी एबी फॉर्म घेऊन जातील, असेही समजते. दरम्यान, महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी बैठक पार पडली होती. बैठकीनंतरही 20 ते 22 जागांवर तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. नागपूर दक्षिण, श्रीगोंदा, शिर्डी, औसा, मिरज, हिंगोली या जिल्ह्यातील जागांवर तिढा कायम असून तीनही पक्षांनी येथील जागांवर दावा केला आहे. याबाबत नाना पटोले यांनी देखील माहिती दिली आहे. मात्र हा तिढा लवकरच सुटेल असे आश्वासन देखील नाना पटोले यांनी दिले आहे.
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकांवेळी ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे, अशा सूचना देण्यासाठी जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.