धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चोरगाव येथील दिव्यांग अशोक बुधा सोनवणे या निराधार तरूणाच्या मदतीसाठी धरणगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यामाध्यमातून किरणा साहित्याचे कीट प्रदान करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील ७५ टक्के दिव्यांग असलेले अशोक बुधा सोनवणे हे पूर्णतः निराधार व दिव्यांग आहेत. अशोककडे उदरनिर्वाहासाठी कोणतेच साधन नाहीत. किवा कोणता व्यवसाय करू शकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. त्याचे दोघे पाय दिव्यांग झाले असल्याने ते बसून राहतात, त्यांना ऊठ-बस देखील करता येत नाही. त्यांचे चुलत भाऊ प्रकाश सोनवणे हे त्यांना लहान बाळाला कडेवर घ्यावे त्या पद्धतीने कडेवर घेऊन आज गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी धरणगाव तहसील कार्यालयात आले.
याबाबत तालुका अपंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांचे समक्ष त्यांची कैफियत मांडली. दिव्यांग अशोकला गावातील नातेवाईक किंवा ओळखीचे मित्र हे त्यांना दोन वेळचे जेवण दिले जाते. याबाबत पूर्ण चौकशी केल्यानंतर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तहसील कार्यालयाच्यावतीने एक महिना भर किरणा पुरेल ऐवढे किराणा किट तसेच वर्ल्ड विजन इंडिया धरणगावतर्फे एक महिन्याचे अन्नधान्य,गहू, तांदूळ त्यांना देऊ केले. शिवाय रेशनकार्ड व संजय गांधी योजनेचा लाभ देखील मिळवून देण्याचे त्यांना आश्वासन दिले. या मदतीनमुळे दिव्यांग अशोक सोनवणे हा भारावला आहे. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे तालुका दक्षता समितीचे सदस्य रवींद्र कंखरे, संजय पाटील अपंग असोसिएशनच्या सदस्य जयश्री पाटील, शिपाई निजाम शेख आदी उपस्थित होते.