पारोळा : प्रतिनिधी
बालाजी महाराजांच्या यात्रेत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला. यात दहा ते पंधरा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह पुरुषांच्याही खिशाला कात्री लावत रोख रक्कम लांबविणाऱ्या तिघा महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी महाराजांच्या रथोत्सवात – भाविकांनी मोठी गर्दी केली होती यानिमित्ताने शेकडो भाविक बालाजीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी १० ते १५ महिलांच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारत हात साफ केला. पारोळा पोलिसांनी नीतू क्रांती भोसले (२५), पूनम शिवरा भोसले (२२), रजनी मनसू भोसले (२०, छत्रपती संभाजीनगर) या तिन्ही महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील वर्धमाननगरमध्ये राहत असलेल्या निकिता भरत जाधव या बालाजींच्या दर्शनासाठी आल्या असता महिलांनी त्यांच्या गळ्यात असलेले ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले. यासह काही पुरुष भक्तांच्या खिशालाही कात्री लावत पाकिटे लंपास केली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे