मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी लागण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. आज सकाळी ९ वाजता महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट असल्याचं सांगितलं जात आहे.
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. विधानसभे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. दरम्यान, आजची कॅबिनेट शेवटची असून लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
या राज्यमंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर जागा देण्याच्या निर्णयासह प्रत्येक आयटीआयमध्ये संविधान मंदिर उभारण्याबरोबरच राज्यातील कौशल्यविकास विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात आगरी समाजाच्या आर्थिक विकासासाठी आगरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.