मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचार सहित लागण्याचे संकेत असल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून यात मनसेने देखील महत्वाची भूमिका घेतली आहे. नुकतेच आज मनसेचा मेळावा झाला असून यात राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारांनी महाराष्ट्र निर्माण सेनेवर विश्वास दाखवावा, त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हे हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवून दाखवावा, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. या महाराष्ट्राची धुरा माझ्या हातामध्ये द्या, अशी विनंती देखील राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत देखील युती सोबत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा सुरू केली होती. त्यातच त्यांनी 200 पेक्षा जास्त विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा देखील केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती किंवा महाआघाडीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. आता मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. कारण हा केवळ मराठा समाजाचा विषय नाही. तर या देशांमध्ये जेवढी राज्ये आहेत, त्या प्रत्येक राज्यातील विविध समाजाचा हा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आरक्षणाची मागणी कोणताच पक्ष पूर्ण करू शकत नाही, असा दावा देखील त्यांनी केला. एका राज्यात एका समाजाला आरक्षण दिले तर सर्वच राज्यातील इतर समाज देखील पेटून उठतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र कोणत्याही समाज हाताला काम असल्याशिवाय राहू नये, ही माझी भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरे स्पष्ट बोलतो, त्यामुळेच मी दिसतो. ते इतरांना नको वाटते, असे देखील त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हा विषय पुन्हा निघणार नाही. पुढील वेळेस जेव्हा पुन्हा निवडणुका येतील त्यानंतरच या विषयाचे वारे वाहू लागतील, असा दावा देखील त्यांनी केला.
या आधी देखील मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. राज्यातील जिल्हा जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले होते. मात्र त्या मोर्चांचे काय झाले? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, मी त्यांना जाऊन देखील हाच प्रश्न विचारला होता. मागणी आहे मात्र, ती पूर्ण कशी करायची? हे सांगा, असे मी त्यांना विचारले होते. वास्तविक मराठा समाजाचे आरक्षण हा अत्यंत किचकट विषय आहे. त्यातून मार्ग निघणे शक्य नाही. हे शरद पवारांपासून सर्वांनाच माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर देखील केले. मात्र त्यांच्या हातात तेवढी शक्तीच नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, प्रत्येक मराठी युवकाच्या हाताला काम, ही आमची भूमीका असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.