धरणगाव : प्रतिनिधी
शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात निवेदन देण्यासाठी आज सकल मराठा आणि बौद्ध समाज बांधवांसह शहरातील माळी, चौधरी, मुस्लीम, मातंग, धनगर, बडगुजर, पारधी, ब्राम्हण, धोबी, चर्मकार आणि इतर समाजातील बांधवही मोठ्या संख्येने धरणगाव पालिकेवर धडकले. निवेदन देतांना विचारलेल्या प्रश्नांवर पालिका अभियंता आणि शिल्पकाराची चांगलीच थ..थ..फ..फ उडाली.
पुतळा उभारणी संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे !
निवेदनात म्हटले होते की, धरणगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळा उभारण्याचे कार्य सुरू आहे, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना घडली, सदर घटनेचे देशात सर्व ठिकाणी तीव्र निदर्शने करीत पडसाद उमटले, तमाम शिवप्रेमी जनतेकडून प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने संपूर्ण शिवप्रेमी तसेच आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन अशी घटना घडू नये, या अनुषंगाने शासनाने पुतळा उभारणी संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 2017 नुसार सर्व नियम तथा अटी शर्तींचे काटेकोर पणे पालन करण्यात यावे.
कला संचलनाची मान्यता घेण्यात यावी !
दोन्ही महापुरुषांचे “क्ले” मॉडेल ची कला संचलनाची मान्यता घेण्यात यावी व मान्यता घेतलेल्या ‘क्ले’ मॉडेल प्रमाणेच पुतळ्यांची उभारणी करण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मॉडेल शिल्पकाराकडून मागविण्यात यावे व सदर ‘क्ले’ मॉडेल शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेसाठी बघण्यासाठी उपलब्ध करून द्यावे व शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेच्या पसंतीनुसार ‘क्ले’ मॉडेल व त्याप्रमाणेच दोन्ही पुतळे विराजमान करण्यात यावे.
शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेचा लोक वर्गणीत सहभागासाठी अकाउंट नंबर प्रसिद्ध करावा !
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार जा. क्र. 166/2024 पुतळ्यासाठी निधी उपलब्ध नाही,तरी दोन्ही पुतळ्यांचा निधी नगर परिषदेने/ शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती, जर शासनाकडे निधी उपलब्ध नसेल व शासन लोक वर्गणीतून दोन्ही पुतळे उभारणार असेल तर त्या संदर्भात स्वतंत्र बँकेत अकाउंट उघडून त्याद्वारे आलेल्या लोकवर्गणीतून पुतळ्यासाठी खर्च करण्यात यावा व ते अकाउंट नंबर A/c no.तमाम शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेसाठी लोक वर्गणीसाठी सर्व माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावे.
स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे !
दोन्ही महापुरुषांच्या सुरू असलेल्या पूर्ण कृती पुतळ्याचे आराखडा, साईट प्लान, पुतळ्याचे रेखाचित्र, रंग,उंची धातू, वजन तसेच वास्तुशास्त्राज्ञ च्या नावासह माहिती देण्यात यावी व सदर माहिती दोन्ही पुतळ्याच्या जवळ मोठे बॅनर आंबेडकर प्रेमी व शिवप्रेमी जनतेसाठी लावण्यात यावे. शासनाच्या नियमानुसार गठीत केलेल्या समितीची सर्व अध्यक्ष सचिव व सर्व सदस्यांची नावे हूद्यासह देण्यात यावी तसेच आज पावतो या संदर्भात झालेल्या बैठकींचे विवरण देण्यात यावे. शासकीय समिती च्या समन्वयासाठी धरणगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमी तसेच तमाम आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन एक समिती स्थापन करण्यात यावी. दोन्ही महापुरुषांच्या पुतळा निर्माण करणारा शिल्पकार आपण दिलेल्या माहितीनुसार समरत पाटील यांनी भरलेले टेंडर,वर्क ऑर्डरची तात्काळ माहिती (कॉपी )देण्यात यावी. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे कार्य प्रगतीपथावर आहे या संदर्भात शासकीय समितीची शिफारस व उपलब्ध निधी व खर्च झालेल्या निधी व झालेले कामाचे मोजमाप संदर्भात माहिती देण्यात यावी व मालवण येथील झालेली घटना बघता शासन नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.
दोघं पुतळ्यांसमोरील बांधकाम तात्काळ निष्कषित करण्यात यावे !
तमाम शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी व धरणगाव शहरातील जनतेच्या मागणीनुसार दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यासमोरील मुख्य रस्ता कायम वरदळीचा असून या ठिकाणी सर्व शाळेचे विद्यार्थी, खेड्यापाड्यतील तसेच गावातील लोक दररोज मोठ्या संख्येने वापर करतात व कायम स्वरूपी वाहतुकीची समस्या भेडसावते या ठिकाणी नेहमी लहान /मोठे अपघात देखील होत असतात तसंच दोन्ही महापुरुषांच्या मिरवणुकी दरम्यान होणारी गर्दी तसेच पुतळ्याच्या सौंदर्य सुशोभीकरण करण्यास होणारी बाधा लक्षात घेता डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील बांधकाम तात्काळ निष्कषित करण्यात यावे व या महापुरुषांच्या पुतळ्यांचे मांगल्ये राखण्यात यावे. तमाम शिवप्रेमी तथा तमाम आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेता नवीन पूर्णाकृती पुतळ्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय सध्या स्थित असलेले महापुरुषांचे पुतळे हटवण्यात येऊ नये. वरील सर्व मुद्दे,बाबी व तमाम शिवप्रेमी व तमाम डॉ आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना, आस्था लक्षात घेऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच जाती-धर्मात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
पालिका अभियंता आणि शिल्पकाराची थ..थ..फ..फ !
बांधकाम कशा पद्धतीचे सुरु आहे?, त्याच्यावर कोण लक्ष देतेय?, इस्टीमेट प्रमाणे काम होत आहे का?, रेकॉर्ड ठेवला जातोय का?, पुतळ्याचे वजना प्रमाणे चबुतऱ्याचे काम सुरु आहे का?, काम अपूर्ण असताना बिले कशी काढली गेली?, आदी प्रश्न विचारातच पालिका अभियंता भंबेरी उडाली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी मी समोर येवून आपल्या सोबत चर्चा करतो. उद्या (शुक्रवार) दुपारी या आपण चर्चा करू असे सांगितले. धुळे येथील शिल्पकाराला गुलाबराव वाघ, माजी मराठा समाजाचे नेते रमेश पाटील, दीपक वाघमारे यांनी फोन लावून माहिती घेतली असता त्याला शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंबंधित कोणतीच माहिती व्यवस्थित देता आली नाही. मला दहा लाखाचा चेक आणि ३० लाख रोख दिले आहेत?, यावर रमेश माणिक यांनी कोणी पैसे दिलेत?, २० हजार पेक्षा जास्त रक्कम रोख स्वरुपात घेता येत नाही, हे तुम्हाला माहित नाही का?, राष्ट्रपुरूषांची स्मारकं ही सरकारची असतात खाजगी इसमाकडून तुम्ही पैसे कसे घेतले?, पालिकेने वर्क ऑर्डर दिली आहे का?, राज्याच्या कला संचालय विभागाची परवानगी मिळाली आहे का?, पुतळा किती उंचीचा, कोणता धातू वापरणार आहात?, पुतळे किती पैशात ठरले?, पुतळे कशा स्वरूपाचे आहेत? आदी बाबत कोणतीही माहिती धुळे येथील शिल्पकाराला देता आली नाही. पालिका अभियंता आणि शिल्पकाराची उडालेली थ..थ..फ..फ बघता अनेक गंभीर घोळ झाले असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु होती.
दोन नंबरच्या धंदेवाल्यांना राष्ट्रपुरूषांच्या स्मारकां संबंधी निर्णय घेण्याचे अधिकार कोणी दिलेत?
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमल्यानंतर सर्व शिवप्रेमी आणि आंबेडकरी प्रेमी जनता पालिकेची दिशेने रवाना झाली. पालिकेवर धडकल्यावर गुलाबराव वाघ, दीपक वाघमारे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, जानकीराम पाटील, रमेश माणिक पाटील, लक्ष्मण पाटील, आबा वाघ, गोवर्धन सोनवणे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलीत. दोन नंबरचे धंदेवाल्यांना राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार कोणी दिलेत?,दोघं समाजाला विश्ववासात का घेण्यात आले नाही?, दोन नंबरवाल्यांच्या पैशाने स्मारकं विकत घेवू दिली जाणार नाहीत. गावातील सर्व लोकं पैसे देतील आणि त्यातूनच पुतळे उभे राहतील. तसेच चबुतऱ्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यातूनच पुतळे खरेदी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मनोगतात मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच सर्व नियम पाळून स्मारकं झाली पाहिजेत. जेणे करून भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये. चबुतऱ्याचे काम बोगस स्वरूपाचे होत असल्याचेही अनेकांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मान्यवरांची उपस्थिती !
यावेळी मराठे समाजाचे अध्यक्ष भरत मराठे, सीताराम मराठे, कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आबा पाटील, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी,धनराज माळी, दशरथ महाजन, अड. शरद माळी,छोटू महाजन, प्रल्हाद महाजन तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी, उपाध्यक्ष भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, राकेश चौधरी,गुप्ता समाजाचे कपिल गुप्ता, ब्राम्हण समाजाचे सागर वाजपेयी, मराठा सेवा संघाचे जगदीश मराठे, नामदेव मराठे, राहुल मराठे, मराठा समाजाचे पंच बबलू मराठे, अण्णा पाटील, समाधान पाटील, चुडामण पाटील, दिनकर पाटील, गोरख पाटील, भगवान शिंदे, दीपक पाटील, भूषण पाटील, त्र्यंबक पाटील, मोहन पाटील, अरविंद देवरे, मनोज पाटील, अनिल मराठे, भुषण मराठे,पिंटू मराठे,तूषार पाटील,सोपान मराठे, बडगुजर समाजाचे अध्यक्ष मनोहर बडगुजर, धनगर समाजाचे कृउबा संचालक दिलीप धनगर, भीमा धनगर, अमोल हरपे, मुस्लिम समाजाचे हाजी इब्राहिम, नईम काजी, बंटी शेख, बौद्ध समाजाचे बी.डी.शिरसाठ, मिलिंद शिरसाठ, नाना सोनावणे, अरविंद मोरे, अप्पा पारेराव, प्रकाश सपकाळे, राज पवार, मेहतर समाजाचे करण वाघरे, आकाश बिवाल, संदीप किरोसिया यांच्यासह पारधी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, धोबी समाजाचे विनोद रोकडे, चर्मकार समाजाचे शहर अध्यक्ष धर्मराज मोरे आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.