जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पथकाला यश
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४० वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क १५ किलो वजनाचा गोळा काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी उपचार करण्याऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील ४० वर्षीय कमलबाई रमेश भिल या महिलेला पोटात दुखत होते. तसेच, वेदना असह्य होत होत्या. नातेवाईकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला दिसून आला.
वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केली असता, तिच्या पोटातून १५ किलोचा गोळा निघाला. जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून, गर्भाशय देखील काढण्यात आले. यामुळे महिलेचा जीव वाचला.
यशस्वी उपचार करण्याऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले. उपचार करण्याकामी विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. अनिता ध्रुवे, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. शीतल ताटे, डॉ. राजश्री येसगे यांनी शस्त्रक्रिया केली. बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्नील इंकणे, इन्चार्ज सिस्टर नीला जोशी, सोनाली पाटील, सीमा राठोड यांच्यासह विजय बागुल, कुणाल कंडारे, कृष्णा पाटील, रवींद्र पवार, किशोर चांगरे या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले