जळगाव : प्रतिनिधी
बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करत असताना तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडल्याने प्रमिलाबाई शंकर चव्हाण (५५, रा. सुप्रीम कॉलनी) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना २ ऑक्टोबर रोजी औद्योगिक वसाहत परिसरात ई- सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याच्या तक्रारीवरून ६ ऑक्टोबर रोजी बांधकाम मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-सेक्टरमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असताना प्रमिलाबाई चव्हाण यांचा तोल जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या व गंभीर जखमी झाल्या. बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम मालक धीरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता हलगर्जी व निष्काळजीपणा केल्याने महिला गंभीर जखमी झाली व त्यास मालक व ठेकेदार जबाबदार असल्याची फिर्याद महिलेचे पती शंकर चव्हाण (६४) यांनी दिली.