नंदुरबार : वृत्तसंस्था
जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला. यामध्ये सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्या आहेत. या अपघातामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांकाचा ट्रक ए पी 31 पी जी 0869 या ट्रकने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडली. त्यामुळे रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असूनही उपाययोजना मात्र शून्य आहेत. पुढील तपास सुरु असून अपघाताचे कारण कळालेले नाही. तर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
मेंढपाळ लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने 100 हून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्या आहेत. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातकडे जात होता. ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतला असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मेंढ्यांचा मृत्यूने मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.