जळगाव प्रतिनिधी । शहरातील भवानीपेठेत राहणाऱ्या तरूणाची मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस निवृत्ती कासार (वय-२८) रा. भवानी पेठ जळगाव हा आई, वडील, पत्नीसह वास्तव्याला आहे. भांड्याचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ जानेवारी रोजी ईलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी त्यांनी फोन-पे वरून त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ऑनलाईन ५ हजार रूपये पेमेंट केले. परंतू क्रेडीट कार्डवर पैसे आले नाही नाही म्हणून २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तेजसने क्रेडीट कार्ड कस्टमर केअरला फोन लावला. पैश्यांबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून एक आप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे क्रेडीट कार्ड स्कॅन करून तेजस कासार यांनी सर्व माहिती भरली. तरी देखील पैसे परत आले नाही. म्हणून तेजसने अनोखळी व्यक्तीला फोन केला त्यावेळी त्यांचा फोन होल्डवर ठेवला. त्यामुळे कंटाळून तेजस यांनी फोन कट केला. परत पुन्हा दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अनोळखी नंबरवरून कॉल आला. यावेळी दुसरे क्रेडीटा कार्ड आहे का याची विचारणा केली असता तेजस यांनी दुसऱ्या बँकेचे क्रेडीट कार्डची संपुर्ण माहिती ॲप्लीकेशनच्या माध्यमातून दिली. काही वेळातच तेजस यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून एकुण ८४ हजार ८८९ रूपये ऑनलाईन वर्ग करून फसवणूक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी तेजस यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.