यवतमाळ : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर संजय राठोड हे गेले होते. यावेळी यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे संजय राठोड यांच्या वाहनाने बुलोरो पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की माल वाहतूक करणारा बोलोरो पिकअप पलटी झाला. त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर संजय राठोड यांच्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संजय राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. हा भीषण अपघात काल रात्री 2 ते 2.15 च्या दरम्यान झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीच्या दर्शनाला 5 तारखेला येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय राठोड हे 3 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. ते रात्रीच्या सुमारास पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. त्यावेळी प्रवासादरम्यान आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. या दोन्हीही गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. त्यावेळी अचानक पिकअप व्हॅनने ब्रेक दाबला. यावेळी मागून संजय राठोड यांची कार येत होती. या कारची धडक पिकअप व्हॅनला बसली आणि ती व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला. त्याला अपघातानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे ही धडक इतकी भीषण होती की संजय राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या जोरदार धडकेमुळे संजय राठोड यांच्या कारच्या एअरबॅग्जही उघडल्या गेल्या. याच एअरबॅग्जमुळे संजय राठोड यांचा जीव थोडक्यात बचावला, असे बोललं जात आहे.