जळगाव : प्रतिनिधी
जळगाव एमआयडीसीचा ‘डी’दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनसाठी 23 रुपये तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आयोजित खान्देश विभागस्तरीय *’महाराष्ट्राची उद्योग भरारी ‘ या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा ) भोळे, आ. किशोर पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, प्रादेशिक अधिकारी, धुळे दिगंबर पारधी, प्रादेशिक अधिकारी, जळगाव सुनील घाटे उपस्थित होते.
जळगाव मध्ये जे उद्योग भवन उभं राहणार आहे, त्यात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय असावे ही पालकमंत्री यांची मागणी मान्य केली असून दोन दिवसात त्याचा लेखी आदेश निघेल. हे प्रादेशिक कार्यालय आठवड्यातले दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक यांच्या अडीअडचणी जाणून त्याची सोडवणूक करेल अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.
चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे सांगून जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि पाचोरा या दोन तालुक्याला नवीन एमआयडीसी, जळगावला विस्तारीत एमआयडीसीला मंजूरी दिल्याचे सांगितले. त्याच बरोबर आपण उद्योग मंत्री झाल्याबरोबर राज्यात उद्योजकांचे थकलेल्या प्रोत्साहन निधी पोटी 2 हजार 400 कोटी रुपये दिले असून आज पर्यंत जवळपास 3 हजार कोटी पेक्षा अधिकचा प्रोत्साहन निधी दिल्याचे सांगितले.
स्थानिक उद्योगजकांची 96 हजार कोटीची गुंतवणूक
राज्यात गेल्या दोन वर्षात उद्योगात 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. राज्यात स्थानिक उद्योजकांनी त्यांच्या उद्योग विस्तारासाठी 96 हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक केली आहे. त्यातून 85 हजार रोजगार निर्माण झाले असल्याचे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली विश्वकर्मा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित झाला. त्यावेळी संपूर्ण देशातून सर्वात अधिक 11 लाख 50 हजार नोंद आपल्याला राज्यातून झाली.
पालकमंत्र्यांनी मानले उद्योग मंत्र्यांचे आभार!
उद्योगमंत्र्यांनी आपण कलेल्या मागण्या मान्य केल्याचे सांगून जळगाव जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी टेक्सटाईल पार्क द्यावा जेणे करून इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याच बरोबर केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग इथं व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. चोपडा, पाचोरा, आणि जळगावला विस्तारित एमआयडीसी दिल्या बद्दल जळगाव जिल्ह्याच्या वतीने उद्योगमंत्र्यांचे आभार मानले.
उप मुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी ‘ या कार्यक्रमा मागची भूमिका विशद करुन. राज्यातील उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात दिला. यावेळी स्थानिक उद्योगात चमकदार कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरवही करण्यात आला.