पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच विविध माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच बारामतीत गुरुवारी दि.३ आयोजित पत्रकार परिषदेवेळी काही प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री चांगलेच भडकले. तुम्ही काहीही प्रश्न विचारता. माझ्या योग्यतेचे प्रश्न विचारा. मी तुम्हाला उत्तरे देईन. मात्र तुम्ही काहीही प्रश्न विचारत राहिला की मग माझी सटकते, असे ते म्हणाले.
बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन लोकसभेपूर्वी अजित पवार यांनी केले. परंतु तेथील घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. एकालाही घराची चावी मिळाली नसल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीत नुकतीच केली होती. त्यावर पवार यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले. त्यानंतर उद्घाटनाच्या विषयावर स्पष्टीकरण द्यायलाही ते विसरले नाहीत. मला वाटलं म्हणून मी उद्घाटन केले असेही ते म्हणाले.
मी फार नम्र झालो आहे. असे सांगत अजित पवार यांनी जागा वाटपाच्या बातम्यांबाबत पत्रकारांना कानपिचक्या दिल्या. तुम्हाला काहीच माहिती नसते, तरीही बातम्या चालवता. त्यातून आमची मात्र करमणूक होते, असे म्हणत त्यांनी महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न गुंडाळून टाकला. अमित शहा यांच्याशी बैठक झाली असल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर, मला तुझ्याकडूनच कळलं की महायुतीची जागा वाटपाची बैठक पार पडली, असा उलट प्रश्न पवार यांनी केला. जागा वाटपाची चर्चा झाली नाही, वेगळ्या प्रश्नावर चर्चा झाली, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून अल्पसंख्याकांना दहा टक्के जागा दिल्या जाणार आहेत, यासंबंधी प्रश्न विचारला असता, मी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे, तुम्ही माझी भाषणे बघत नाही का? असा उलट सवाल पवार यांनी केला.