पारोळा प्रतिनिधी । शहरातील लोकसंख्या पाहता नवीन पाण्याच्या टाकी, जलशुध्दीकरण आणि पाण्याची साठवणूकसाठी राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी नवीन जलकुंभासाठी निधी मंजूर केला आहे. या जलकुंभाची कामे तातडीने पुर्ण करून पारोळेकरांची तहान भागवा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी संबंधित विभागाला केले आहे.
पारोळा नगरीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे नवीन जलकुंभ बनविण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑक्टोबर रोजी शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची क्षमता वाढविणेबाबत कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला.
पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनी द्वारे पारोळा शहराला पुरविले जाते धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांनाही शहरातील नागरिकांना ८ ते १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो या नवीन जलकुंभ उभारणी व जलशुद्धीकरणाची क्षमता वाढल्या नंतर शहराला किमान एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होईल याबाबत शहरवासीयांची कित्येक वर्षापासून असलेली मागणी होती. वरील कामासाठी मिळालेला निधी मार्च २०२२ अखेर पर्यत खर्च करणे गरजेचे असल्याने सदर कामाचे लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन ईस्टीमेट, तांत्रीक मंजूरी,कार्यादेश देऊन काम सूरू करून शहरवासीयांची तहान भागवावी असे निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासक मा.ज्योती भगत यांना डॉ. हर्षल माने शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील यांनी दिले.