मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. पण या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. शिवाय आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोघांनाही आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप केले गेले होते. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणे, पुरावे नष्ट करणे असे या दोघांवर आरोप होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना हे दोघे फरार होते. सहआरोपी भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक आरोप करत होते. तर मुख्य आरोपी शिंदे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. शिंदे हा पोलिस चकमकीत मारला गेला. तरीही कोतवाल व आपटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना याच प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.