लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सांगली जिल्ह्यातील मिरजेत अवैधरित्या रक्तचंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांनी पकडला आहे. यात तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदन असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे.
वाहन चालक यासीन इनायतउल्ला खान (वय ४५, रा. अद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कर्नाटकातून आणलेले रक्तचंदन पुढे कोणाला पोहोचवले जाणार होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्या देशभर गाजत असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय गाजत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारे एक वाहन सांगली शहरात येणार असल्याची माहिती मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास धामणी रोडवर थांबलेल्या टेम्पोची (13 KA 6900) तपासणी केली. पोलीस आणि वन विभागाने केलेल्या कारवाईत रक्तचंदनाचे ३२ ओंडके आढळले. हे रक्तचंदन फळांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेटमागे लपवले होते. जप्त केलेल्या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. हे रक्तचंदन कोठून आणले जात आहे याची चौकशी करण्यात येत आहे.
दक्षिणेतील पुष्पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तब्बल अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडल्याने तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली पोलिसांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रक्तचंदन पकडले आहे. या प्रकरणातील पुष्पाभाऊ कोण? याच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. दरम्यान, जप्त केलेले रक्तचंदन पुढे कोणाकडे पाठवले जात होते, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.