मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी आदेश जारी केला. यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले आहे, मी या पावलाचे स्वागत करतो, कारण मी शेतकरी आहे आणि ‘गाय’ ही प्रत्येक शेतकऱ्याची आई आहे. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय खेळी म्हणून हे केले गेले आहे.
नाना पटोले यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की, “नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून गोमांस निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कत्तलखाने उघडण्यात आले. त्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. आता गोमांसाच्या निर्यातीत देशाचा अव्वल क्रमांक लागतोय. सरकार, असा निर्णय होत असेल तर त्यात वास्तव असले पाहिजे, राजकारण नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली.