मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुनदा यांनी बंगाली, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘मृगया’ चित्रपटासाठी मिळाला. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या ‘तहादर कथा’ या बंगाली चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात मिथुन यांनी स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती. तिसरा राष्ट्रीय पुरस्कार ‘स्वामी विवेकानंद’ चित्रपटासाठी मिळाला. या चित्रपटात मिथुन यांनी रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली होती. काही कारणांमुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. जानेवारी २०२४ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.