जळगाव : प्रतिनिधी
युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आहे.पीक विम्याच्या माध्यमातून १ रुपयांमध्ये पिक विमा देणार सरकार हे फक्त महाराष्ट्र सरकार असून सर्व समावेशक पिक विमा योजना व हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊन सर्वाधिक नुकसान भरपाई देणारा जिल्हा जळगाव जिल्हा ठरत आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सोबत जोड व्यवसाय करावा. शेती व शेतकरी हेच शाश्वत उद्योगाचे साधन असून शासन शेती व शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासा व्हावा या दृष्टीने वाटचाल करी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चलित फवारणी पंपाचे वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते.
कृषी विभाग, आत्मा जळगाव व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांचे संयुक्त विद्यमाने राज्य पुरस्कृत कापूस – सोयाबीन उत्पादकता वाढ विशेष कृती योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर नॅनो युरिया, नॅनो डी.ए.पी., कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चालित फवारणी पंपाचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करून आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
यावेळी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये इफको लि. मार्फत १२ किसान ड्रोन शेतकऱ्यांना माफक दरात फवारणी करिता उपलब्ध करून दिले असून युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एक रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करून आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. मागील वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रु. पाच हजार प्रती हेक्टरी अनुदान घोषित केले असून जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ होणार असून शेतकऱ्यांनी तात्काळ ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी प्रास्ताविकात कृषी विभागाच्या योजना बाबत सविस्तर माहिती विषद केली.
डॉ. शरद जाधव यांनी रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी केले व आभार अमित भामरे यांनी मानले.
या कार्यक्रम प्रसंगी तज्ञ शेतकरी साहेबराव वराडे, किशोर चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, इफको चे केशव शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ इंजि. वैभव सूर्यवंशी, तुषार गोरे, किरण मांडवडे, किरण जाधव, मंडळ कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, अमित भामरे, राहुल साळुंखे, योगेश अत्रे, परिमल घोडके, दशरथ सोनवणेकृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते