मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण चर्चेत असतांना नुकतेच याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर सहा दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्हासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. या दफनविधीस उल्हासनगरमधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत स्मशानभूमीत येऊन आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दफनविधीसाठी सोमवारपर्यंत जागा मिळवून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.
२३ सप्टेंबर रोजी अक्षयचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आले. २४ सप्टेंबरला मुंबईतील जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टेमनंतर अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. मृतदेहावर बदलापूर, अंबरनाथ आणि कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यास तेथील नागरिकांनी तसेच मनसेने जोरदार विरोध दर्शवला हेाता. अंबरनाथ स्मशानभूमीत विरोधाचे फलकही लावलेे होते. गेल्या ३ दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांकडून जागेचा शेाध सुरू होता. अक्षयचा मृतदेह दफन करण्यास जागा मिळत नसल्याने त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी वकील अमित कटारनवरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले हेाते.
रविवारी पोलिसांनी उल्हासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. दफनविधीसाठी खड्डाही खोदला होता. स्थानिक नागरिकांनी विरोध करत हा खड्डा बुजवला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आंदोलक स्मशानभूमीत शिरू नये म्हणून स्मशानभूमीच्या दोन्ही गेटला कुलूप लावत बुजवलेला खड्डा प्रशासनाने पुन्हा खोदला. अक्षयच्या आईवडिलांनी कळवा येथून मृतदेह ताब्यात घेत संध्याकाळी सहाला कडक पोलिस बंदोबस्तात अक्षयचा मृतदेह दफन केला. अक्षयचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयातून उल्हासनगर येथील स्मशानभूमीमध्ये याच रुग्णवाहिकेतून नेला गेला.