यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील मनवेल येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत झाले. यात एका २२ वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि कंबरेवर धारदार वस्तूने वार करून त्याला जबर दुखापत केली. ही घटना दिनांक २५ रोजी रात्री घडली होती. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरागड येथील रहिवासी गणेश राजू सोळुंके (२२) हा तरुण मनवेल, ता. यावल या गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला होता. तेथे नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत घडले. शिरागड गावात गणेश सोळुंके याला ताराचंद व्यंकट सोळंके, कैलास व्यंकट सोळंके व प्रशांत कैलास सोळंके या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत त्याच्या पाठीला व कंबरेला धारदार वस्तूने वार करीत जबर दुखापत केली. या तरुणाला जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून यातील ताराचंद सोळंके याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.