नाशिक : वृत्तसंस्था
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव गुरुवारी (दि. 3) पासून सुरू होत आहे. यात्रोत्सव काळात खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली असून गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून ८० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अनुकेश नरेश उपस्थितीत होते. बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उत्सव काळात दहा ते बारा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. यात्रा कालावधीत प्रवेशद्वारपासून ते मंदिर गाभाऱ्यातपर्यंत 15 ठिकाणांपासून टप्प्याटप्याने मंदिर सोडण्यात येणार आहे. तसेच नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगी नांदूरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर व तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणूक करण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त आपती टाळण्यासाठी संरक्षण दल, ग्रामसुरक्षा दल, अग्निशामक दल आदीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य परिवहन परिवहन महामंडळाच्या वतीने 375 बसेस उपलब्ध राहणार असल्याचे आगार व्यवस्थापनाने सांगितले. नांदुरी ते सप्तशुंगगड साठी 80 बसेसचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.