रावेर : प्रतिनिधी
खानापूर-चोरवड सीमेवर बोकाळलेला जुगार व सट्ट्याचा बाजार भुसावळ येथील सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल सिंह यांनी जानेवारी २०१८ मध्ये उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर सहा वर्षांनी फैजपूर सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी खानापूर येथील या सट्टा पिढीवर स्वतः धाड टाकून ११ आरोपींना ताब्यात घेत व आठ मोटारसायकलींसह ११ मोबाइल व ५ हजार २०० ची रोकड तथा सट्टयाचे साहित्य असा ३ लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील चोरवड व खानापूर सीमावर्ती भागात तत्कालीन अधिकारी निलोत्पल सिंह यांनी अवैध धंदे ‘निल’ केल्यानंतर सतत तीन वर्षे अवैध धंदे सुरू करण्यासाठी कुणाचीही हिंमत झाली नव्हती. मध्य प्रदेश सीमावर्ती भाग अवैध धंद्यांपासून मुक्त होता. तद्नंतर मात्र सन २०२२ पासून पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. यात हप्तेखोरीसाठी तक्रारीही वाढल्या, तर तक्रारींची दखल घेत अन्नपूर्णा सिंह यांनी व त्यांच्या पोलिस पथकाने खानापूर येथील स्टेशन रोडलगतच्या कन्हैयालाल महाराज नगरातील चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून दबक्या पावलांनी मागोवा घेत सापळा रचून सट्टापिढीवर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अकस्मात धाड टाकून ईश्वर रूपा बिरपन, शेख अमीन शेख सलीम वगैरे ११ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पाच हजार २०० रुपये रोख, १५ मोबाइल, आठ मोटारसायकली असा ३ लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रावेर पोलिस स्टेशनचे पोकॉ. समाधान ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ रवींद्र वंजारी, पो. कॉ. समाधान ठाकूर, महेंद्र महाजन, गणेश मनुरे, अक्षय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.