रावेर : प्रतिनिधी
भुसावळ येथून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे अवैध विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीस पाल रस्त्यावरील कुसुंबा ते लालमाती दरम्यानच्या बल्लारशहा बाबा दर्याजवळ पोलिसांनी पकडले. ही कारवाई २५ रोजी रावेर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल अनीस अब्दुल मज्जीद (वय ४६, रा. वडीखानका, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यास अटक केली आहे. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार तुषार पाटील तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. विष्णू बिन्हाडे, पो. हे.कॉ. विनोद पाटील, पो.हे.कॉ. ईश्वर देशमुख, पो.कॉ राहुल महाजन तथा रावेर पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. रवींद्र वंजारी, पो. कॉ. सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे यांना कारवाई करण्याची सूचना दिली होती. रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार तुषार पाटील हे करीत आहेत.