धुळे : वृत्तसंस्था
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील वनजमिनीवरील एका क्षेत्रात तूर व कापूस पिकाच्या आडोशात लावलेली गांजाची रोपे सांगवी पोलिसांच्या पथकाने जप्त केली. या मुद्देमालाची किंमत ३४ लाख ८० हजार एवढी आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात एनडीपीएसअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांपैकी ४ जणांना जेरबंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील वनपट्टयात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जाते. यावर्षीदेखील या परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याचे दिसून आल्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने गांजा लागवडीचा शोध घेण्यात आला.
याबाबत पोहेकॉ चत्तरसिंग लखा खसावद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिसात सुरज कालुसिंग पावरा (वय २०, रा. रोहिणी), रोशलाल हजाऱ्या पावरा (रा. बोंबल्यापाडा- रोहिणी), रोहित सुभाराम पावरा (रा. रोहिणी), समर बळीराम पावरा (रा. रोहिणी), रणजित रामसिंग पावरा (रा. बोंबल्यापाडा), युवराज मांगीलाल पावरा (रा. लाकड्या हनुमान), भीमराव उर्फ भीमा बन्सीराम पावरा (रा. लाकड्या हनुमान) असे ७ जणांविरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.