जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात महिलांच्या खुनाच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना साकेगाव (ता. व भुसावळ) येथे, तर दुसरी घटना गोरगावले (ता. चोपडा) येथे घडली. सोनाली महेंद्र कोळी (वय २६, रा. साकेगाव) आणि बायशीबाई मोहन पावरा (४२, रा. गोरगावले) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. सागर रमेश कोळी (२८, रा. व साकेगाव) आणि अनिल वीरजी पावरा (३५, रा. गोरगावले) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव येथे सोनाली कोळी ही महिला परिवारासह वास्तव्याला होती. बुधवारी, २५ सप्टेबर रोजी रात्री २ ११:३० च्या सुमारास महिलेचे गावातील सागर कोळी यांच्याशी भांडण झाले. या भांडणातून सागर याने चाकूने सोनाली हिच्या पोट व पाठीवर वार करून तिचा खून केला. दोघांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विनोद सुभाष कुंभार (२९) याच्यावरही सागरने चाकूने वार केले. यात विनोद हा जखमी झाला आहे. संशयित सागर याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी घटना गोरगावले (ता. चोपडा) येथे घडली. बायशीबाई हिचा गावातीलच अनिल पावरा याने गळा दाबून खून केला. ही घटना बुधवारी रात्री घडली. गुरुवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. यातील संशयित अनिल यास अटक करण्यात आली आहे.
साकेगाव येथील सोनाली कोळी हिला संशयिताने धमकी दिल्यावर तिने ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता. परंतु पोलिस पोहचण्यापूर्वीच संशयिताने सोनाली हिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केला होता. गोरगावले येथील बायशीबाईचा खून केल्यानंतर संशयित धुळे जिल्ह्यातील अंबा-खांबाळे जंगलात फरार झाला होता. अडावद पोलिसांनी भरपावसात त्याला जंगलातून अटक केली. मयत बायशीबाई हिचा मुलगा गणेश मोहन पावरा (१९) याच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.