भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अज्ञाताने अत्याचार केला होता. मात्र पीडितेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही. मात्र पीडितेचे पोट दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घडला प्रकार समोर आला. अज्ञात प्रवाशाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून भुसावळ येथे ही मुलगी सुरत जाण्यासाठी आली व सुरत जाणाऱ्या गाडीतून तिने प्रवास सुरू केला. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यावर ही १७ वर्षीय पीडिता शौचास गेली असता, शौचालयात मागून तोंडाला मास्क लावून एक युवक आला व त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत मुलीने काहीही माहिती तिच्या आई-वडिलांना दिली नाही; मात्र आता सहा महिन्यांनंतर मुलीच्या पोटात दुखी लागल्याने सुरत येथील सरकारी दवाखान्यात तपासणीला नेले असता, त्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे मुलीकडे पालकांनी चौकशी केल्यावर तिने भुसावळ-सुरत गाडीत अत्याचार झाल्याची कबुली दिली.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तोंडाला मास्क बांधलेल्या व्यक्ती विरुद्ध खटोदरा (जि. सुरत) येथील पोलिस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला. तेथून हा गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात २३ सप्टेंबरला वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहेत