अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या न.प.च्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार अमळनेर पोलिसात देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न.प.चे अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील सराफ बाजार भागातील नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले होते. त्यांना नगरपरिषदेने वेळोवेळी नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलिस कर्मचारी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला गेले. त्यावेळी नागराज चोरडिया व त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया व दोन्ही सुनांनी विरोध केला व शिवीगाळ करू लागले.
इंदुमती चोरडिया यांनी स्वतःच्या व सुनांच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन तुम्ही जर अतिक्रमण काढले तर जाळून घेऊ व तुमचे नाव टाकून देऊ, अशी धमकी दिली. या पथकाने चोरडिया कुटुंबाला हे कृत्य बेकायदेशीर असून, कारवाई होईल, असे सांगूनही त्यांनी शिवीगाळ करणे सुरूच ठेवल्याने हे पथक अतिक्रमण न काढता परतले. शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेकॉ प्रमोद बागडे हे करीत आहेत