जळगाव प्रतिनिधी ।
जळगाव, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची आज मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुंबईत मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील जागा निश्चित व उमेदवारांवर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते उमेश पाटील, जिल्हाप्रमुख हर्षल माने विष्णू भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आले आहे. जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर शिंदे गटात या आमदारांनी प्रवेश केला, यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा या जागांसाठी मोठ्या प्रमाणात आग्रह असणार आहे. चाळीसगावची जागा उमेश पाटलांसाठी शिवसेना अग्रही आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघात देखील तगडा उमेदवार शिवसेनेला गवसला आहे. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव वाघ, युवा सेना प्रमुख निलेश चौधरी, लकी अण्णा यासारखे दिग्गज उमेदवार आहेत. परंतु ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता जरी असली तरी या दिग्गज उमेदवारांसाठी शिवसेना नेते प्रतिष्ठा लावणार का याकडे लक्ष लागून आहे ?. पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी या प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे जवळपास ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. जळगाव शहरात शिवसेनेकडून कुलभूषण पाटील, जयश्री महाजन, विष्णू भंगाळे यासारखे प्रबळ उमेदवार आहेत. कुलभूषण पाटील यांची प्रबळ दावेदारी असल्याने बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत बैठकीनंतर जाहीर होईलच परंतु आजच्या या बैठकीकडे विशेष लक्ष लागून आहे.